गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे एकूण 15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत यापुर्वीच मंजूर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मंजूर करण्यात आल्याने प्रत्येक कुटुंबाला 10 लाखांची शासकीय मदत मिळणार आहे.
जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात दि.10 ऑगस्ट 2026 रोजी सर्पदंशाची घटना घडली होती. या घटनेत दीपिका एकता लकडा, अनु गुजाम कोरेटी आणि सुष्मिता सरोजित मंडल या तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला.
या विद्यार्थिनींच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रतिकुटुंब 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, तिन्ही विद्यार्थिनींच्या वारसांसाठी एकूण 15 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मंजूर अर्थसहाय्याची रक्कम जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या संबंधित बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सचिवालयाच्या निर्देशानुसार मृत विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांची आवश्यक ती संपूर्ण पडताळणी करून त्यांना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मंजूर निधीचा विहित प्रयोजनासाठी विनियोग झाल्याबाबतचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्यात येणार आहे.
































