गडचिरोली : जिल्ह्याला लाभलेली सुपीक जमीन, पाण्याची मुबलकता, विविध खनिज व वन संपत्तीची उपलब्धता, या सर्वांसोबतच राज्य व केंद्र शासनाकडून प्रत्येक उद्योगासाठी मिळणारी मदत, यामुळे जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय सुरू करून तो वाढविण्यासाठी पोषक वातावरण आहे. या सर्वांचा लाभ घेवून उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक मानसिकता व प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी व्यक्त केले.
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नियोजन भवन येथे आयोजित इग्नाईट महाराष्ट्र या कार्यशाळेत जिल्हाधिकारी दैने मार्गदर्शन करत होते. यावेळी उद्योग अधिकारी शिवणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड, विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक संचालक स्नेहल ढोके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवई, लॉयड्स मेटल्सचे संचालक विक्रम मेहता, मैत्री संस्थेचे सागर ऑटी आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी दैने म्हणाले, उद्योग क्षेत्रात पुढे येवू इच्छिणाऱ्या युवकांनी गडचिरोली हा मागास असल्याची भावना मनातून काढून टाकावी. हा जिल्हा नैसर्गिक संपत्तीने श्रीमंत आहे. येथील आदिवासी शिक्षित आहेत. येथे मध, मोहफुल, चारोळी, तेंदूपत्ती, बांबू, सागवान, औषधी वनस्पती आदि वनउपज, तसेच लोह, ग्रेनाईट व इतर खनिज, काजू, स्ट्रॉबेरी पिकविणारी सुपीक जमीन, बारमाही नद्यांमुळे विविध प्रक्रिया उद्योग व्यवसायात अमर्याद संधींची उपलब्धता आहे. उद्योग व्यवसायासाठी पुढे येणाऱ्यांना शासन मदत करायला नेहमीच तयार असल्याचे दैने यांनी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील उद्योजक तसेच नवउद्योजक सहभागी झाले होते.