राज्याची अर्थव्यवस्था वाढविण्यात गडचिरोलीचा मोठा वाटा असेल- ना.जयस्वाल

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी शासन वचनबद्ध आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात गडचिरोली जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा असेल, असा विश्वास व्यक्त करत या जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले.

76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड.जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना स्वीकारली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ.नामदेव किरसान, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ना.जयस्वाल पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील लोह प्रकल्पाला चालना मिळेल. भविष्यातला ‘स्टील हब’ ही नवी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना रेल्वे, विमान, आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवून आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य सेवेतही जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच दिशेने सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला प्रगत आणि उन्नत बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून भविष्यात गडचिरोली राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्वानपथकाची प्रात्यक्षिके

यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी परेडचे निरीक्षण करून विविध पथकांची मानवंदना स्विकारली. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलीस दलाच्या श्वान पथकाने आकर्षक प्रात्याक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक कार्यक्रमात सरस्वती विद्यालय, विद्याविहार कॉन्व्हेंट, नवजीवन पब्लिक स्कुल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी ॲकेडमी यांनी देखील समुहनृत्य सादर केले.

आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती विपरीत असताना अतिदुर्गम भागात अडचणींना तोंड देत आरोग्य सेवा देणारे, तसेच आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यात जिमलगट्टाच्या वैद्यकीय अधिकारी डॅा.दुर्गा जराते, मानेवाराच्या आरोग्य सेविका छाया तोडासे, लाहेरीचे आरोग्य सेवक डोमा वनकर, जि.प.चे सांख्यिकी अन्वेषक सुनील चापले, आरेवाडाच्या आशा सेविका संगीता पुंगाटी आदींचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे हेसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते आरोग्य विभागातील गट्टा प्रा.आ.केंद्राचे डॅा.पवनकुमार राहेरकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम सहायक चंदू वाघाडे यांना गौरविण्यात आले.