गावात शिरलेला बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाच्या पथकाने दिले जीवदान

बघ्यांची एकच गर्दी, पहा व्हिडीओ

गडचिरोली : पाणी आणि शिकारीच्या शोधात एक बिबट्या रविवारच्या मध्यरात्री देऊळगाव या गावात शिरला. अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने तो विहिरीतील पाण्यात पडला. सकाळी ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पण वनविभागाच्या पथकाने त्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले.

आरमोरीजवळच्या देऊळगाव या गावात सकाळी बिबट्या गावातल्या विहिरीत पडल्याची खबर पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान वनविभागाच्या पथकाने तातडीने गावात दाखल होऊन बिबट्याला पाण्याच्या वर राहण्यासाठी आधार म्हणून विहिरीत छोटी शिडी सोडली. बिबट्या त्या शिडीवर जाऊन बसला. त्यानंतर विहिरीत एक पिंजरा सोडून त्या पिंजऱ्यात बिबट्याला घेऊन दार बंद करण्यात आले.

लोकांची गर्दी पाहून भांबावलेला बिबट्या त्यातही गुरगुरत आपला राग व्यक्त करत होता. वनविभागाच्या पथकाने लगेच त्याला वाहनातून वडसा वनविभागाच्या कार्यालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्याची प्रकृती ठिक असल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.