भामरागड : साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धा-2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 125 शाळांनी व 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यात लोक बिरादरी आश्रमशाळा हेमलकसा येथील इयत्ता 9 वीची विद्यार्थीनी खुशी शिवाजी गोटा हिने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.
राष्ट्र सेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धा-2024 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोक बिरादरी आश्रम शाळेच्या 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करायचा होता. यामध्ये ऑनलाईन नोंदणी करणे, त्यानंतर आयोजकांकडून सहभाग, विद्यार्थ्यांना प्रकल्प साहित्य व एक पुस्तक पोस्टाद्वारे पाठविण्यात आले होते. त्यानंतर तीन भागात प्रकल्प लिहायचा होता. शाळेची व स्वतःची माहिती, प्रश्नावलीद्वारे आपल्या परिसरातील माहिती गोळा करणे आणि मिळालेल्या पुस्तकांचा सारांश लिहिणे, असे त्याचे स्वरूप होते.
अंतिम मूल्यांकनात राज्यातून 31 विद्यार्थी निवडले होते. त्यात नागपूर विभागातून खुशी शिवाजी गोटा हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला साने गुरुजी स्मारक, सिंहगड रस्ता पुणे येथे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांचे हस्ते चार हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव, राष्ट्र सेवादलाचे विश्वस्त प्रमोद मुजुमदार, लेखिका प्रा.तेजस्विनी देसाई, राष्ट्र सेवादलाचे दल पत्रिका संपादक संदेश भंडारे इत्यादी उपस्थित होते.
खुशीच्या यशाबद्दल जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांची तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोक बिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका समीक्षा आमटे, मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी, तसेच शाळेतील शिक्षकांनी खुशीचे कौतुक केले.