तीन राज्यातील भाविकांची चढला टिपागडचा पहाड, श्रद्धाळूंची गर्दी

चार दिवसांच्या वार्षिक यात्रेची सांगता

कोरची : जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात, निसर्गरम्य वातावरणात टिपागड टेकडीवरील आदिवासींचे दैवत गुरु बाबाच्या मंदिरात यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. मागील ४८ वर्षांपासून टिपागड पहाडावर माघ पौर्णिमेनिमित्त ही पाच दिवसांची यात्रा दरवर्षी भरते.

यावर्षी यात्रेची सुरुवात गढ पुजारी जंतुराम कुरचाम यांच्या हस्ते पूजा करून झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हजारो भाविक गुरुबाबाच्या मठात दर्शन व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथील यात्रेत सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे टिपागड परिसरात पूर्वी राजे गोविंदशहा मडावी तर आता मुरूमगावचे जमीनदार भूपेंद्रशहा मडावी यांचे राज आहे. टिपागड डोंगराळ निसर्गरम्य वातावरणात असून येथे चारही बाजूच्या टेकडीवर मध्यस्थी बारमाही पाणी साचून राहणारा तलाव आहे. या तलावात पर्यटक बोटिंगचाही आनंद घेतात. मात्र येथे जाण्यासाठी कोरचीपासून 53 किमी अंतर पार करावे लागते. टिपागडच्या डोंगर पायथ्याशी न्याहाकल हे गाव आहे. या गावापासून पुन्हा चार किलोमीटर दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने जावे लागते. त्यानंतर टिपागड डोंगरावर पायवाटेने दोन किमी चढावे लागते. येथे भाविक आणि पर्यटकांची दरवर्षीच गर्दी उसळत असल्याने शासनाने येथील रस्ता व पायऱ्या आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा पुरविण्याची अपेक्षा केली जात आहे.

स्थानिक नागरिकांकडून, ग्रामपंचायतमार्फत यात्रेपूर्वी मार्ग दुरुस्त केला जातो. सदर यात्रेमध्ये मोठा झेलिया ग्रामपंचायतअंतर्गत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई लावण्यात आली होती. विविध प्रकारची दुकानेही सजली होती.