अहेरीच्या महिला रुग्णालयात अखेर पदनिर्मितीला शासनाची मंजुरी

बांधकाम होऊनही मिळत नव्हती सेवा

अहेरी : येथील महिला रुग्णालयाची इमारत बांधकाम पूर्ण होऊन जवळपास वर्षभराचा कालावधी पू्र्ण झाला. मात्र आवश्यक पदनिर्मितीला शासनाची मंजुरी नसल्यामुळे या भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळण्यास अडसर निर्माण झाला होता. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पद निर्मितीबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने शासन निर्णय निर्गमित केल्याने आवश्यक पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अहेरी क्षेत्राचे आमदार व राज्याचे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रीपदाच्या कालावधीतच संबंधित विभागाला पद निर्मितीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा केला.

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नागरिकांनी कौल दिल्यानंतर धर्मरावबाबा यांनी सर्वात आधी महिला रुग्णालयाच्या पद निर्मितीच्या विषयाला हात घातला. त्याचीच परिणती म्हणून अखेर शासनाने या महिला रुग्णालयाकरिता 42 नियमित पदांची निर्मिती करून त्याला मान्यता दिली. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या एकूण 55 पदांना मान्यता दिली आहे. याप्रकारे या रुग्णालयासाठी एकूण 97 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.

नियमित पदांमध्ये वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी (स्त्री व प्रसुती तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ज्ञ), क्ष किरण तंत्रज्ञ, बधिरीकरण तंत्रज्ञ, इत्यादी एकूण 20 नियमित जागांची भरती होणार आहे. याशिवाय बाह्ययंत्रणेकडून अधिपरिचारिका (12 जागा), बालरोग परिचारिका (5) व इतर मिळून 55 जागा भरल्या जाणार आहेत.

आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात मोडणाऱ्या ताडगाव ता.भामरागड व जारावंडी ता.एटापल्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे मंजूर केली असून लवकरच त्यांच्या बांधकामांना सुरुवात होणार आहे.