आला पावसाळा, झाडे लावा अन् जगवा, वनविभाग देणार निम्म्या किमतीत

वन महोत्सवांतर्गत विक्री केंद्र सुरू

गडचिरोली : कृषी दिन आणि वृक्षलागवड सप्ताहाचे औचित्य साधून मुख्य वनसंरक्षक कार्यालय आणि नगर परिषद गडचिरोली येथे वनमहोत्सव केंद्राला सुरूवात करण्यात आली. या कालावधीत रोपांची लागवड व्हावी यासाठी विक्री केली जाणार असून निम्मा किमतीत ही रोपे उपलब्ध केली जाणार आहेत. प्रादेशिक वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे वनमहोत्सव केंद्र सुरू करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेश झोळे, विभागीय वन अधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे तसेच गडचिरोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये एक पेड माँ के नाम (Plant4mother) ही योजना, तसेच राज्य सरकारच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या रोपवाटीकांमध्ये सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार एक पेड माँ के नाम योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांनी केले.

वृक्षतोडीमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे वाढत असलेली उष्णता आणि अनियमित पाऊस यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन विभागीय वनअधिकारी गणेश झोळे यांनी केले.

यावेळी 15 महिलांना सीताफळ वृक्षांचे वाटप करण्यात आले. वन महोत्सव कालावधीत 9 महिन्यांची तसेच 18 महिन्यांची रोपे सवलतीच्या दरात निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. लागवड केलेल्या रोपांची माहिती अमृतवृक्ष या मोबाईल ॲपवर भरण्यासाठी शासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम आणि धीरज ढेंबरे यांनी नियोजन केले होते. कार्यक्रमासाठी गडचिरोली सामाजिक वनिकरण परिक्षेत्रातील व गडचिरोली (प्रादे) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.