मुख्यालयी राहण्यास दांडी मारणाऱ्या तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांची दखल

महसूलमंत्र्यांचे विभागीय आयुक्तांना आदेश

आरमोरी : आरमोरी येथील तहसीलदारांसह, न.प.मुख्याधिकारी आणि इतर काही कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे कार्यालयात ते बऱ्याच वेळा उशिरा पोहोचतात. त्यातून नागरिकांच्या कामांना उशिर होऊन अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे (एपी) जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवाणी यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत बावनकुळे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, असा आदेश विभागीय आयुक्तांना दिला.

दिलीप मोटवाणी यांच्या तक्रारीनुसार, आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी आणि निवासी नायब तहसीलदार दोनाडकर हे ब्रह्मपुरी येथून येतात. नायब तहसीलदार लाडे आणि मुख्याधिकारी माधुरी सलामे ह्या देसाईगंज ते आरमोरी असा प्रवास करतात. न.प.चे प्रशासकीय अधिकारी प्रितेश काटेखाये हे ब्रह्मपुरी ते आरमोरी, तर ना.तहसीलदार वाकुलकर हे गडचिरोली ते आरमोरी, तलाठी उसेंडी देसाईगंज ते आरमोरी, मंडळ अधिकारी नागापुरे, गटविकास अधिकारी आरेवार हे ब्रह्मपुरी येथून तर गटविकास अधिकाऱ्यांचे सहायक असलेले कुर्झेकर हे नागभिड येथून येणे-जाणे करतात.

आधीच कार्यालयात येण्यास उशिर होतो. त्यात आरमोरी तहसीलदारांच्या दालनात मुरूम-रेतीचे कंत्राटदार तासन् तास बसून असतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांना भेटण्यासाठी 4 वाजतापूर्वी त्यांना वेळच नसतो. तहसीलदार उषा चौधरी यांनी आरमोरीत खोली भाड्याने घेतलेली असली तरी प्रत्यक्षात त्या तिथे किती राहतात, यावर मोटवाणी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी महसूलमंत्र्‍यांकडे केली होती. त्यावर बावनकुळे यांनी कारवाईचे आदेश दिले.