सीआरपीएफ जवानाने बंदुकीची गोळी चालवून केली आत्महत्या

कौटुंबिक ताणतणाव जबाबदार?

धानोरा : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन 113 च्या धानोरा येथील मुख्यालयात कार्यरत जवानाने सोमवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. गिरीराज किशोर (30) असे त्या जवानाचे नाव असून ते मूळचे आग्रा (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होते.

सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्प परिसरात गिरीराज यांनी स्वत:वर झाडलेली गोळी त्यांच्या डोक्यातून दुसऱ्या बाजुने आरपार निघून गेली. त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. जेमतेम पाच महिन्यांपूर्वी, म्हणजे आॅक्टोबर 2024 मध्ये त्यांची धानोरा येथे बदली झाली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्यांची पुणे येथे सीआरपीएफकडून ड्युटी लागली होती. तेथून रविवारीच ते धानोऱ्यात परतले होते. त्यांचा विवाहसुद्धा झालेला होता. पण ड्युटीमुळे त्यांना कुटुंबाला मूळ गावी ठेवून इकडे राहावे लागत होते. त्याच ताणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्षभरात तीन घटना

11 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकानेही स्वत:वर गोळी चालवून आपले जीवन संपविले होते. त्याच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर तैनात सुरक्षा रक्षकाने अशाच पद्धतीने आत्महत्या केली होती. मानसिक ताणातून जिल्ह्यात पोलीस जवानांनी आत्महत्या करण्याची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.