Home पब्लिक प्रॉब्लेम दक्षिण गडचिरोलीतील रस्त्यांसह विविध कामांसाठी भरीव निधी

दक्षिण गडचिरोलीतील रस्त्यांसह विविध कामांसाठी भरीव निधी

आ.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रयत्न

अहेरी : अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याच्या आणि विशेषत: अहेरी विधानसभा क्षेत्राच्या पदरात भरीव निधी पाडून घेण्यात आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांना यश आले आहे. अहेरी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण करण्याकरिता 10 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला. याशिवाय एटापल्ली येथे 4 कोटींच्या खर्चातून सुसज्ज विश्रामगृह उभारले जाणार आहे.

विशेष बाब म्हणजे, चंद्रपूर (घंटाचौकी) ते मुलचेरामार्गे आलापल्ली या राज्य मार्ग क्रमांक 370 दरम्यान असलेल्या मार्कंडा (देव) ते गोमणी या रस्त्याच्या बांधकामाकरिता 10 कोटी रुपयांचा निधी धर्मरावबाबांनी मंजूर करवून घेतला आहे. यासह सिरोंचा व अहेरी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रोमपल्ली-झिंगानूर कोपेला या जिल्हा मार्ग क्रमांक 26 च्या बांधकामाकरिता सुद्धा 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. जवळपास या अर्थसंकल्पातून अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकासाकरिता जवळपास 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील महत्वाच्या कामांना गती मिळणार आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातून सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या मार्गांची दर्जोन्नती होऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ते वळते करण्यात आले आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा रस्त्यांचे बांधकाम होणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन माजी मंत्री तथा आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेऊन आपल्या विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकरिता 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे.

मुलचेरा-आलापल्ली दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात स्थानिकांकडून वारंवार रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली जात होती. याची दखल घेऊन धर्मरावबाबा यांनी सदर निधी मंजूर करवून घेतला आहे. यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी निधीची मागणी करण्यात आली असून लवकरच सदर रस्त्यांच्या बांधकामासाठी निधी मंजूर होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.