Home दैनंदिन बातम्या गुजरातमधील एकता दिन परेडमध्ये 200 सी-60 कमांडोंचा सहभाग

गुजरातमधील एकता दिन परेडमध्ये 200 सी-60 कमांडोंचा सहभाग

50 नागरिकही परेड अनुभवणार

नागरिकांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करताना पोलीस अधीक्षक एम.रमेश

गडचिरोली : राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता व अखंडता यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31 ऑक्टोबर रोजी गुजरात राज्यातील एकतानगर (केवडिया) येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात राष्ट्रीय एकता दिनाच्या परेड होणार आहे. या परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-60 पथकातील 200 जवानांचे पथक सहभागी होणार आहे. याशिवाय पोलिसांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 50 नागरिकांना सदर एकता परेड प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे.

एकता दिन परेडच्या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील 50 नागरिकांची ही परेड प्रत्यक्ष पाहण्यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या वाहनाला पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाची सांस्कृतिक विविधता, राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेचा संदेश अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

दीर्घकाळ माओवादाच्या आव्हानाला सामोरे गेल्यानंतर पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, सी-60 कमांडोंच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकासात्मक उपक्रमांमुळे आता गडचिरोली जिल्ह्राच्या अभिलेखावर एकही माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सी-60 कमांडोंनी माओवादविरोधी अभियानांमध्ये दाखविलेले धैर्य, शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही जिल्हा पोलीस दलाची अभिमानास्पद ओळख आहे. या जवानांचा राष्ट्रीय स्तरावरील एकता परेडमध्ये सहभाग ही गडचिरोली जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असून, यामुळे जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर अधिक ठळक होण्यास मदत होणार आहे.