गडचिरोली : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्तरांवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नव्याने समाविष्ट खेळांसह शासनमान्य एकूण 46 विनाअनुदानित क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या स्पर्धांचे आयोजन जिल्ह्यातील संबंधित एकविध क्रीडा संघटनांच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने करण्यात येणार आहे.
सन 2026-27 या शैक्षणिक सत्रातील विनाअनुदानित शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांनी आपल्या संघटनेच्या नावाची नोंद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात करावी. त्यासाठी संघटना अधिकृत असल्याबाबतची आवश्यक कागदपत्रे 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा प्रकारांमध्ये आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, टेक्सबॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपरसेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग-ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग व बीच व्हॉलीबॉल यांचा समावेश करण्या आला आहे.
तसेच टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुन दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोविनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो (श्स्त्रांग मार्शल आर्ट), फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट, कलरीपत्तु व गतका या खेळांचाही समावेश आहे.
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजन सुलभ होण्यासाठी संबंधित संघटनांनी विहित मुदतीत कागदपत्रांसह नोंद करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
































