Home पब्लिक प्रॉब्लेम जिल्ह्यातील रस्ते, पुलांसाठी शासनाकडे 442 कोटींच्या कामांचे प्रस्ताव सादर

जिल्ह्यातील रस्ते, पुलांसाठी शासनाकडे 442 कोटींच्या कामांचे प्रस्ताव सादर

डिसेंबरमध्ये मंजुरी मिळण्याची अपेक्षा

रस्ते आणि पुलाअभावी अनेक भागात अजूनही नागरिकांना अशी कसरत करावी लागते

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात रस्ते आणि पुलांची गरज आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 442 कोटी रुपयांची 97 कामे प्रस्तावित केली आहेत. डिसेंबरच्या आर्थिक नियोजनात या कामांना मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने प्रस्तावित केलेल्या कामांमध्ये 115 कोटींचे 128 रस्ते, जवळपास 46 कोटींचे 5 पूल, 162 कोटी किमतीचे 46 मुख्य जिल्हा मार्ग आणि या मार्गांवरील 119 कोटींचे 18 पूल अशा कामांचा समावेश असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण यांनी दिली.

डावी-कडवी विचारसरणी प्रभावित जिल्ह्यात विकासात्मक कामांसाठी केंद्र सरकारकडून मिळत असलेला निधी आता मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मिळणाऱ्या निधीतून काही कामे होणे अपेक्षित आहेत. याशिवाय एटापल्ली तालुक्यात जिल्हा खनिज निधीतून काही कामे मंजूर झाली आहेत. मात्र खनिज निधी खर्चासाठी 25 किलोमीटरच्या अंतराची मर्यादा असल्यामुळे उर्वरित भागातील कामांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीवर विसंबून राहावे लागत आहे.

माओवादाचा प्रभाव संपल्यानंतर आता दुर्गम भागातील कामे वेगाने होणे गरजेचे आहे. पण त्यासाठी नवीन कामांना मंजुरी मिळण्यासोबत त्यासाठी वेळेत निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.