Home पब्लिक प्रॉब्लेम आठवडाभरानंतरही वनमजुरांचे आलापल्लीत साखळी उपोषण सुरूच

आठवडाभरानंतरही वनमजुरांचे आलापल्लीत साखळी उपोषण सुरूच

काही प्रमाणात वेतन मिळण्याचे संकेत

आलापल्ली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत लाकडाचे डेपो, तसेच जंगल परिसरात आवश्यकतेनुसार रोजंदारी वनमजुर म्हणून कामावर घेण्यात आलेल्या वनमजुरांनी थकित वेतनासाठी सुरू केलेले साखळी उपोषण आठवडाभरानंतरही सुरूच आहे. दरम्यान मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी काही प्रमाणात वेतन मिळण्याचे संकेत दिले आहे. मात्र वनमजुरांचे त्यामुळे समाधान झालेले नाही.

दरम्यान अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोकआंदोलन न्यासचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या वनमजुरांमधील गट बांधणी व ओढवन मोजमाप या कामांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाही. हे सदर वेतन बल्लारशा वाहतूक विपणनतर्फे लाकुड डेपो आलापल्ली येथे होत असते.

यासंदर्भात वनमजुरांच्या वतीने रवि गज्जलवार, भीमराव कोसरे, सागर काटेल, रितीक मडावी, सुरज वानखेडे, तिरुपती एलकरी, सत्यवान आत्राम, राकेश आत्राम, बजरंग कुमराम व अन्य वनमजुरांनी अनेकदा संबंधित वनाधिकाऱ्यांची भेट घेतली, परंतु वरिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे सर्व रोजंदारी वनमजुरांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या मार्गाने आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

दिवाळीसारखा मोठा सण आला असताना या मजुरांच्या हाती हक्काची मजुरी नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.