आरमोरी : आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकणारच, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी व्यक्त केला. आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षीय मार्गदर्शन करत होते.
या बैठकीला माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, माजी उपसभापती चंदू वडपल्लीवर, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य कल्पना तिजारे, विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले, सहअध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा सचिव कपिल बागडे, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, प्रदीप हजारे, बी.टी.सेलोकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना रवींद्र वासेकर म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुका ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असून त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षसंघटना बळकट करावी. त्यासाठी गाव तिथे शाखा व बुथ तिथे समितीचे गठन लवकरात लवकर करावे, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निष्ठा व इमानदारीने पक्षाचे काम करावे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीप प्रज्वलीत करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी विधानसभा क्षेत्राचे सरचिटणीस राकेश बेहरे, तालुका सरचिटणीस रामदास दहिकर, तालुका उपाध्यक्ष राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, सुनिल बांगरे, रिंकू झरकर, सारंग जांभुळे, सुनील ठाकरे, अनिल अल्बनकर, उदाराम दिघोरे, मनोज बनपूरकर, योगाजी थोराक, रवि दुमाने, संतोष वाढनकर, निरंजन राऊत, ज्ञानेश्वर सुरपाम, मोरेश्वर चल्लीरवार, विनोद बेहरे, शुभांगी गराडे, नीलिमा कोडापे, विद्या मेश्राम, भूमिका बागडे, पल्लवी रामटेके, प्रशांत मोगरे, मधुकर खापरे, श्रीधर पोटेकर, बंडू रामटेके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































