गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित 32 वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कॉम्प्लेक्स येथे उत्साहात पार पडले. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांचे हित तसेच राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांची भूमिका, या विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षक परिषद पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अनिल नुतिलकंठावार, दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी वि.प.स. तथा राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी शैलेश पर्वते, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष सुरावार, तसेच मनिषा वाकोडे, सुभाष गोतमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनाला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील माध्यमिक व प्राथमिक शाळांतील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिक्षकांच्या विविध समस्या, शिक्षण व्यवस्थेतील बदल, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रमांवर यावेळी सखोल विचारमंथन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते यांनी शिक्षक परिषदेला शुभेच्छा देत, “शिक्षक हा समाजाचा खरा दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांना योग्य संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.” असे सांगत त्यांनी शिक्षकांना समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
शिक्षकहित, शिक्षणहित आणि राष्ट्रहित या त्रिसूत्रीचा संदेश देत हे जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
































