गडचिरोली : घरगुती गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 112 ठिकाणी तपासण्या व छापे टाकण्यात आले. मात्र सर्वाधिक तपासण्या गडचिरोली (30) आणि धानोरा (22) तालुक्यात झाल्या आहेत. इतर तालुक्यांमध्येही अशाच पद्धतीने तपासण्या करून कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या धडक कारवाईदरम्यान प्रामुख्याने व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर, तसेच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
या मोहिमेत सर्वाधिक तपासण्या गडचिरोली आणि धानोरा तालुक्यांत करण्यात आल्या. तपासणीदरम्यान एकूण 4 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यात गडचिरोली तालुक्यात 2 गॅस सिलिंडर, तसेच चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात प्रत्येकी 1 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
अवैध साठवणूक व वापर आढळलेल्या प्रकरणांमध्ये संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मुलचेरा येथे 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली व चामोर्शी पोलीस स्टेशनमध्येही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक किंवा व्यावसायिक वापर आढळल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला असून जिल्ह्यात ही तपासणी मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
































