
गडचिरोली : नागपूरकडे जात असलेल्या एका भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या सी-60 जवानांच्या बॅाम्बरोधक-बुलेटप्रुफ वाहनाला एका बाजुने जोरदार धडक दिली. यामुळे पोलिसांचे वाहनाच्या एका बाजुच्या चाकाचे आणि काही प्रमाणात टिप्परचेही नुकसान झाले. धडकेनंतर पोलिसांचे वाहन रस्त्यालगतच्या शेतात घुसले, पण चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावर योग्य नियंत्रण ठेवल्याने आतमधील जवानांना कोणतीही इजा झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सदर धडक देणारा टिप्पर धानोरा मार्गावरील रस्त्याच्या कामावर गिट्टी पोहोचवून पाचगाव (नागपूर) कडे परत जात होता. त्याचा वेग जास्त होता. अशात एका दुचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या टिप्परने समोरून येणाऱ्या पोलीस जवानांच्या वाहनाला धडक दिली. यामुळे पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून चाकाची डिस्कही वाकली.
जिल्ह्यात विविध प्रकारच्या मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ सुरू आहे. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते असताना वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. वाहतूक नियंत्रकत पोलिसांचे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष असते. त्यामुळे सर्वांसाठीच आता रस्त्यावरून जाताना अपघाताची भिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने या वाहतुकीवर योग्य नियंत्रण ठेवावे, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी, तसेच संवेदनशील भागांमध्ये वाहतुकीसाठी विशेष नियम लागू करावेत, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, विपुल येलटीवार यांनी केली आहे.
































