Home दैनंदिन बातम्या दुर्गम भामरागडमध्ये आज व उद्या योजनांचे मल्टिमीडिया प्रदर्शन

दुर्गम भामरागडमध्ये आज व उद्या योजनांचे मल्टिमीडिया प्रदर्शन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली : राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी आणि नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने भामरागड येथे शासनाच्या विविध योजनांवर आधारित मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी व आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले आहे.

सहपालकमंत्र्यांनी सांगितले की, शासनामार्फत विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत त्यांची माहिती प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या एका टोकावर असलेल्या भामरागड येथे शासनाच्या योजनांचे मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सुविधा यांची माहिती एकाच ठिकाणी पाहण्याची व समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सदर प्रदर्शन दि.17 व 18 मार्च असे दोन दिवस भामरागड तहसील कार्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि.17) सकाळी 11 वाजता सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तहसीलदार किशोर बागडे तसेच लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये शासनाच्या विविध विकास योजनांबरोबरच ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, रोजगार व सामाजिक न्याय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती छायाचित्रे व मल्टिमीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर सादर करण्यात येणार आहे. भामरागड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी केले आहे.