गडचिरोली : शहरासह ग्रामीण भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर सध्या इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. ऐरवी शेतकऱ्यांना कॅन, बॅरेलमध्ये इंधन दिले जात होते. मात्र, विद्यमान परिस्थितीत वाहनाशिवाय इंधन न देण्याची सूचना प्रशासनाकडून पंपचालकांना देण्यात आली आहे. वास्तविक तीन-चार हजार रुपयांचे इंधन खरेदी करण्यासाठी 30 ते 40 किमी अंतरावरून ट्रॅक्टर घेऊन येणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे हवे तर ट्रॅक्टरचे आरसी, शेतीचा सातबारा किंवा घरकुलाचे कार्यारंभ आदेश दाखवायला सांगा, पण कॅन, बॅरेलमध्ये इंधन द्या, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरवात होणार आहे. रबी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू झाला असून खरीपासाठी शेतीचा पोत तयार करण्याच्या कामाला शेतकरी लागले आहेत. यासोबतच घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचीही वाहतूक ग्रामीण भागातील शेतकरी ट्रॅक्टरच्या माध्यमातून करीत आहेत. मात्र, त्यांना पेट्रोलपंपावर बॅरेलमधून इंधनच दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची, तसेच घरकुलाचे बांधकाम करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
डिझेल भरण्यासाठी पंपावर जायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना 30 ते 40 किमीचा प्रवास करावा लागतो. ट्रॅक्टरसारख्या वाहनाला यासाठी अतिरिक्त इंधन खर्च करावे लागते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्यामुळे वाहन उभे करून ठेवावे लागत आहे.
जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक भागात पेट्रोल पंपच नाही. गडचिरोली शहरात सध्या अनेक पेट्रोलपंपावर इंधन नसल्याच्या पाट्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत 30 ते 40 किमीचा प्रवास करून येणाऱ्या नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ही स्थिती असतानाच ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या इंधनासाठी 30 ते 40 किमीचा प्रवास करून वाहन घेऊन येणे कसे शक्य आहे? असाही प्रश्न ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे.
सामान्य शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पेट्रोलपंप धारकांना निर्देर्शित करून ट्रॅक्टरसाठी बॅरेलमधून इंधन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
































