धानोरा : धानोरा तालुक्यातील चातगाव येथे भर वस्तीजवळच्या जंगलाला भीषण आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षांची हाणी झाली. सोमवारी संध्याकाळी भडकलेली ही आग रात्री उशिरापर्यंत जंगलाच्या दिशेने पसरत होती. भर वस्तीलगत झालेल्या या प्रकारामुळे वनविभागाच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

उन्हाळ्याला सुरूवात झाली की जंगलात वणवे लागण्याच्या घटना नवीन नाहीत. अनेक वेळा मोहफुल वेचणारे किंवा तेंदुपत्ता गोळा करणाऱ्यांकडून वणवे लावण्याचे प्रकार घडतात. पण अशा घटना घडूच नये यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. याशिवाय वणवा लागलाच तर तात्काळ तो विझवण्यासाठी आणि आग पसरू नये यासाठी जाळ रेषा (फायर लाईन) आखल्या जातात. त्यामुळे वणवा नियंत्रित राहतो. पण सोमवारी संध्याकाळी चातगावच्या जंगलात भडकलेल्या आगीचे स्वरूप पाहता वनविभागाने त्या ठिकाणी आग नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या होत्या किंवा नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील या जंगलातील आगीच्या ज्वाळा उंचपर्यंत गेल्याने अनेक मोठ्या वृक्षांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. चातगाव बाजार परिसराच्या मागील बाजुच्या जंगलातून ही आग पसरत गेली. गावालगत आग एवढी भडकेपर्यंत वनविभागाच्या लक्षात न येणे ही बाब वनविभागाच्या सतर्कतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
































