गडचिरोली : महाराष्ट्रातील आदिवासीबहुल व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज, गृहनिर्माण व शहरी विकासाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनूसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात विविध योजनांची अंमलबजावणी अपुरी राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख करण्यात आला आहे.
वीज पुरवठ्याची सुविधा
दुर्गम गावांमध्ये नियमित वीज पुरवठा होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची गंभीर समस्या आहे. अनेक भागांत वीज पोहोचलेली नसून सौर ऊर्जा व मायक्रो-ग्रिड प्रकल्पांची अंमलबजावणी संथगतीने होत आहे, याकडे डॅा.नेते यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.
प्रधानमंत्री आवास योजना
योजनेअंतर्गत मंजूर घरे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत. लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक मार्गदर्शन व प्रशासकीय सहकार्याचा अभाव जाणवत आहे. आदिवासी भागात जमिनीच्या मालकीसंदर्भातील अडचणींमुळे योजना रखडत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
शहरी विकास व मूलभूत सुविधा
गडचिरोली व देसाईगंज शहरांमध्ये नाली व्यवस्था, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. अमृत व इतर शहरी योजनांचा अपेक्षित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही. या सर्व समस्यांवर तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मा.खा.नेते म्हणाले.
































