गडचिरोली : गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने जिल्ह्यात दोन वेळा हजेरी लावली असताना अजूनही वातावरण निवळलेले नाही. आजपासून चार दिवस (दि.4 ते 7) पुन्हा ढगाळ वातावरण राहणार असून येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्या अंदाजानुसार तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. याशिवाय काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहू शकेल.
सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मक्याचे पीक उभे आहे. याशिवाय मिरचीचे पीक आणि भाजीपाल्याची लागवड केली आहे. तसेच टरबूज, खरबुजाचे पीक काढणीस आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वादळी वारा, पावसाची शक्यता पाहता काढणीस तयार असलेले पीक काढून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी, तसेच पशुधन झाडाखाली बांधून न ठेवता सुरक्षित ठिकाणी बांधावे, असा सल्ला ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्राने दिला आहे.
आकाशात विजा चमकत असताना शेतात काम करणाऱ्यांनी झाडाखाली उभे राहू नये. जमिनीमध्ये ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा पाण्याच्या स्रोतापासून (तसे तलाव, विहिर) ताबडबोत दूर व्हावे.
































