गडचिरोली : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कंपन्यांकडून स्टील प्लांटसाठी भूसंपादन होत आहे. विशेषतः भेंडाळा, जयरामपूर, अडपल्ली, येवली-शिवणी परिसरात शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. मात्र जिल्ह्यात लोह प्रक्रिया कारखाने होण्यापासून आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन होण्यापासून थांबवणे कठीण झाले आहे, याला सत्ताधारी भाजप एवढाच काँग्रेस पक्षही जबाबदार आहे, अशी टिका डाव्या लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, रोजगाराच्या नावाखाली भाजप-काँग्रेसच्या लोकांनी हा जिल्हा कधीचाच भांडवलदारांच्या हवाली केला आहे. या जिल्ह्यात जंगल-पहाडात नवीन लोहखाणी सुरू होत आहेत, म्हणून लोह प्रक्रिया कारखाने सुरू होत आहेत. वेलमागड-बुर्गी, झेंडेपार-आगरी-मसेली या 11 लोहखाणींची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर दमकोंडवाही, पुसेर-मुतनूरसह 40 पेक्षा अधिक ठिकाणी लोह खाणींची चाचपणी सुरू आहे. जिंदाल, वरद फेरो अलॅायसह जवळपास 40 स्टील प्लांट मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. 50 पेक्षा जास्त कंपन्यांनी स्टील प्लांट उभारण्यासाठी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अहेरी विभागात काही प्रमुख सिमेंट कंपन्यांनीही खाण आणि कारखान्यांसाठी तयारी सुरू केली आहे.
एकूणच गडचिरोली जिल्ह्यात लहान मोठे अनेक स्टील आणि सिमेंट प्लांट येणाऱ्या 5 ते 6 वर्षांत उभारले जाणार आहेत. यासाठी किमान 1 लाख एकर खासगी शेतजमीन भूसंपादीत होऊ शकते. याशिवाय विमानतळ, रेल्वे, समृद्धी महामार्ग, मायनिंग कॅारिडोर मार्ग अशा विविध बाबींसाठी किमान 25 ते 30 हजार एकर शेतजमीन भूसंपादीत होणार असल्याचे हे पदाधिकारी म्हणाले.
आमचे डावे पक्ष आणि स्थानिक ग्रामसभा जेव्हा जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात लोहखाणी नकोत म्हणून लढत आले, तेव्हा तेव्हा भाजप उघडपणे तर काँग्रेस आडमार्गाने खाणींच्या समर्थनात राहिले आहेत, असा आरोप डाव्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा चमकोगिरीच्या आडून स्वतःचे आर्थिक हित साधायचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
आपल्या शेतजमिनी वाचवायच्या असतील तर प्रस्तावित लोहखाणी आणि जिल्हा उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या ‘गडचिरोली जिल्हा खनिज विकास प्राधिकरणा’विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन डाव्या लोकशाही पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला भारतीय कॅाम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य डॉ.महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य रामदास जराते, मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा सचिव देवराव चवळे, आसपाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, श्यामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, ॲड.जगदीश मेश्राम, सचिन मोतकुरवार, सुरज जक्कुलवार, कविता ठाकरे, कविता मेश्राम, चंद्रकांत भोयर, धर्मराज सोरदे, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, विवेक खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सुरेंद्र वासनिक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
































