Home दैनंदिन बातम्या गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

गोभक्तांची बाईक रॅली व निदर्शने

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना गोभक्त

गडचिरोली : गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, देशभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच गोसंवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी गोभक्तांनी बाईक रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुमारे 10 हजार नागरिकांच्या सह्यांसह निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

इंदिरा गांधी चौक येथून बाईक रॅलीला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत शेकडो गोभक्त जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्या ठिकाणी गोमातेचा जयघोष करत निदर्शने करण्यात आली. रॅलीत गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ज्या राज्यांमध्ये गोहत्या बंदी कायदा लागू नाही, त्या राज्यांमध्येही तातडीने कायदा लागू करावा, विद्यमान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि गोसंवर्धनासाठी विविध शासकीय योजना राबवाव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनाही पाठविण्यात आले. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी गोभक्तांनी व्यक्त केली. या बाईक रॅलीचे प्रमुख आयोजक नंदी भगवान होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, व्यापारी आघाडीचे मनोज देवकुले, गुरूदेव हरडे, प्रफुल्ल बिजवे, डॅा.भारत खटी, हेमंत राठी, निलेश पटले, नगरसेविका शिल्पा गव्हारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रॅलीत गोभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग असून गोमातेप्रती असलेली श्रद्धा आणि एकजूट याचे दर्शन घडल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.