अहेरी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं-पीरिपा महायुतीचे उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे पदवीधरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन पॅलेस फंक्शन हॉल येथे झालेल्या या मेळाव्यास पदवीधर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याच्या सुरूवातीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अहेरीच्या नगराध्यक्ष मोहुर्ले, रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गुडेल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, विनोद आकनपल्लीवार, अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, एटापल्ली तालुकाध्यक्ष प्रसाद जक्कुलवार, भामरागडचे तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, सिरोंचाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : कोहळे
यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी पदवीधर मतदारांना संबोधित करताना सांगितले की, “पदवीधर मतदारसंघात काम करण्याची संधी मला द्यावी. पदवीधरांचे प्रश्न, शाळा संचालकांच्या समस्या तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून भाजप संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून पक्षाने माझ्यावर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोहळे हे अभ्यासू व सुशिक्षित व्यक्तिमत्व – डॉ.अशोक नेते
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुधाकर कोहळे हे सुशिक्षित, अभ्यासू व सक्षम व्यक्तिमत्त्व असून पदवीधर मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार आहेत, असे सांगितले. पदवीधरांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे सभागृहात मांडण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी कोहळे यांच्यासारख्या कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. आगामी निवडणुकीत त्यांना विजयी करून महायुतीला बळ द्यावे,” असे आवाहन डॉ.नेते यांनी केले.
माजी मंत्री अम्ब्रिशराव यांचा शुभेच्छा संदेश
दरम्यान, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे कौटुंबिक कारणास्तव मेळाव्यास उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधाकर कोहळे यांचा निश्चित विजय होईल आणि आपण त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला. अहेरीतील या पदवीधर मेळाव्यामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला बळ मिळाले आहे.
































