
देसाईगंज : नागपूर विभागातील शासकीय धान खरेदी केंद्रांच्या विविध अडचणी, धान उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत धान विक्रीची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच धान विक्रीनंतरचे चुकारे व बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आदी मुद्द्यांवर मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी संस्थाचालकांचे गोडाऊन भाडे व हमालीची रक्कम तातडीने देण्याची मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली.
या बैठकीत आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांच्यासह माजी आमदार कृष्णा गजबे यांनी जिल्ह्यातील धान उत्पादक आणि केंद्रांवरील समस्या बैठकीत मांडल्या.
या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह खा.प्रफुल्ल पटेल आणि विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यातील खासदार व आमदार, तथा संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना, तसेच केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आ.मसराम यांनी बैठकीत मांडल्या.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी धान उत्पादनावर अवलंबून असून, शासकीय धान खरेदी केंद्रांची अपुरी संख्या, खरेदीची मर्यादा, धानाची वेळेत उचल न होणे, वाहतूक व गोदामांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तसेच संस्थाचालकांचे थकीत असलेले गोदाम भाडे व थकीत हमालीची रक्कम यामुळे संस्थाचालकांना येणारी तूट इत्यादी बाबी आमदार मसराम यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्या मुद्द्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत मंत्री भुजबळ यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासह आदिवासी विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांना धान खरेदीच्या प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे तात्काळ अदा करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.
मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन
गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीच्या अनुषंगाने माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मंत्री भुजबळ यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील धानाची उचल वेळीच होत नसल्याने, तसेच घट-तुट माफ करूनही खरेदी केंद्र संस्थांना मंडी लेबर चार्जेस आणि कमिशन मिळत नसल्याने खरेदी संस्था पुढे येत नसल्याची बाब गजबे यांनी निवेदनात मांडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत केंद्रावर धान विकण्यास अडचण होऊ नये म्हणून या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला. शेतकऱ्यांना धान विक्रीत कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन मंत्री भुजबळ यांनी यावेळी दिले.
































