धानोरा : धानोरा तालुक्यात आठवडाभराच्या अंतरात वाघाने दुसरा बळी घेतला आहे. तुडमेल (कचकल) परिसरातील शेतशिवारात धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संतराम सनू मडावी या 26 वर्षीय तरुण शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. पेंढरी वनपरिक्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वाघाने आधी छत्तीसगडच्या हद्दीत धुमाकूळ घातल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याने गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतर केल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संतराम हे दि.27 रोजी सकाळी 11 च्या सुमारास शेतात धानाची पाहणी करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. बऱ्याच वेळानंतर ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आठवडाभरापूर्वी इरपनार येथील बिलाशी आनंद या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृ्त्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वाघाने एका बैलावर आणि गायीवर हल्ला करून त्यांनाही ठार केले. आता पुन्हा एका शेतकऱ्याचा बळी गेल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
































