धानोरा : तालुक्यातील तुळमेर येथील शेतकरी शांतराम मडावी यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी मडावी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. कुटुंबातील व्यक्ती गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असा शब्द त्यांना दिला.
यानंतर डॅा.नरोटे यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून परिसरातील परिस्थिती जाणून घेतली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाघाच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतात पीक उभे आहे, शेतीची कामे सुरू आहेत; मात्र शेतात जाताना जीवाची काळजी करावी लागत आहे. कष्टाने पिकवलेले धान वाचवताना शेतकऱ्यांना स्वतःच्या जीवाचा धोका पत्करावा लागत असेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
यावेळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार डॉ.नरोटे यांनी गावकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न मांडले. परिसरात नियमित गस्त वाढवणे, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे याबाबत वनविभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
शेतकऱ्यांनी शेती करावी की जीवाच्या भीतीने शेतात जाणे टाळावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरणात जगता यावे आणि शेतकऱ्यांना कोणतीही भीती न बाळगता शेतीची कामे करता यावीत, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावी. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वनविभागाने ठोस कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार डॉ.नरोटे यांनी यावेळी केली.
या भेटीदरम्यान तहसीलदार गणेश माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी नामदेव बनसोड, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, नेते विजय कुमरे, जिल्हा सचिव सारंग साळवे, तालुका कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, नगरपंचायत धानोराचे गटनेते तथा नगरसेवक संजय कुंडू, नंदू शेंद्रे, दौलत वरवडे, रतन विश्वास, हरिश माकडे, सुभम बालेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंदोरकर, तसेच तलाठी ज्योती ठेंगरी, तलाठी दिनेश पदा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
































