गडचिरोली : आष्टी परिसरातील वाढती लोकसंख्या, विस्तारत असलेली भौगोलिक व्याप्ती, औद्योगिक व व्यापारी विकास, तसेच प्रशासकीय कामकाजाचा वाढता ताण लक्षात घेता, आष्टी येथे मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द न करता ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी केली आहे.
या मागणीसाठी डॉ.नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते संजय पंदिलवार, पवन रामगिरकर, से.नि.प्राचार्य दीपक रॉय, शरद कोलेट्टीवार, व्यंकटी बुरले, डी.एम.बारसागडे, जुगल सरकार, हरिदास मेश्राम, शंकर मार्शेटीवार, माजी सरपंच बेबी बुरांडे, विठ्ठल माचेवार, तसेच आष्टी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आष्टी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी आणि अप्पर तहसील कार्यालयाची असलेली आवश्यकता जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सदर मागणी शासनापर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नागरिकांना 35 किलोमीटरचा फटका
सध्या आष्टी परिसरातील नागरिकांना महसूल व इतर शासकीय कामांसाठी सुमारे 35 किलोमीटर अंतर पार करून आष्टीला यावे लागते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आष्टी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिक विकासामुळे आष्टीचे महत्त्व वाढले
आष्टी हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक, आरोग्य, पोलीस व महसूलविषयक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पोलीस स्टेशन, महसूल मंडळ, महावितरण कार्यालय तसेच विविध औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि नागरिकांची वाढती प्रशासकीय कामे पाहता आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ.अशोक नेते यांनी स्पष्ट केले.
































