Home क्राईम एटापल्ली पोलिसांनी पकडली दोन स्कॅार्पिओतून आलेली देशी दारू

एटापल्ली पोलिसांनी पकडली दोन स्कॅार्पिओतून आलेली देशी दारू

27 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 अटकेत

एटापल्ली : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात छत्तीसगडकडून अवैधपणे छुप्या रितीने दारू आणून ती पुरवठा करणाऱ्या दोन स्कॅार्पिओ वाहनांवर एटापल्ली पोलिसांनी कारवाई करत 6 आरोपींना अटक केली. याशिवाय पसार झालेल्या दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईत 4 लाखांच्या देशी दारूसह दोन वाहने, असा एकूण 27 लाखांचा मुद्देमाल जप्त कण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, दि.29 च्या रात्री एटापल्ली पोलिसांचे पथक गस्त करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून या पथकाने आपला मोर्चा जीवनगट्टा या गावाकडे वळवला. जीवनगट्टा ते बारसेवाडा मार्गावर सापळा लावला असताना काही वेळातच एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्या मार्गाने एका गल्लीत दारू टाकण्यासाठी आली. त्या पाठोपाठ लगेच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली. पांढऱ्या स्कॉर्पिओमधून दारूच्या पेट्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये भरल्या जात असताना पाठीमागून व समोरून पोलिसांच्या गाड्या वाहने येत असल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने दोन्ही वाहने दोन्ही बाजूने अडविल्याने आरोपींचा प्रयत्न निष्फळ झाला. पोलीस पथकाने घटनास्थळावरुन 6 आरोपींना ताब्यात घेतले, तर अंधाराचा फायदा घेऊन 2 इसम पसार झाले.

अटकेतील आरोपींमध्ये आकाश प्रशांत मुजुमदार (32 वर्षे) रा.एटापल्ली, अफसर शेख हुसेन (36 वर्ष) रा.बडा ताजबाग नागपूर, प्रशांत बजरंग आंबटकर (43 वर्ष) रा.नंदुरी ता.समुद्रपूर जि.वर्धा, पंकज शामल बारई (29 वर्ष), रा.जांबिया गट्टा, जिल्हा गडचिरोली, तुषार मिहीर रॉय (25 वर्ष) रा.जनकपूर, पाखंजुर (छ.ग), ह.मु.गडचिरोली तसेच सुरत सत्यजित मंडल (21 वर्ष), रा.पाखंजुर, (छ.ग) ह.मु. गडचिरोली यांचा समावेश आहे.

या आरोपींनी एकूण 60 पेटी देशी दारु आणली होती. त्यातील 29 पेटी जीवनगट्टा येथिल संतोष नरोटे याच्या घरी टाकल्याची माहिती त्यांनी तपासात दिली. पळून गेलेल्या गौरव प्रभाकर माकोडे, आणि मिथुन निर्मल मलिक यांच्यासह संतोष नरोटे (जीवनगट्टा) यांचा शोध सुरू आहे.

दोन्ही चारचाकी वाहने आणि संतोष नरोटे याच्या घरझडतीत रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 22 बॉक्स (किंमत 2,20,000) आणि प्रिमियम नं.1 कोकण देशी दारूचे 18 बॉक्स (एकूण किंमत 1,80,000 रुपये) आढळले. आरोपींच्या अंगझडतीत मिळालेले 7 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

पुढील तपास पोउपनि.चंद्रकांत लांबट हे करीत आहे. ही कारवाई एटापल्ली एसडीपीओ संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोनि.मच्छिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.