गडचिरोली : पोलीस भरतीची तयारी करताना जुळलेली मनं, त्यातून लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले प्रेम, पण त्या दोघांच्या मध्ये तिसरीची एंट्री झाल्याने प्रेम आणि विश्वासाला गेलेला तडा, हे सर्व सहन न झाल्याने एका तरुणीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी अखेर प्रियकर असलेल्या पोलीस शिपायासह एका महिला पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. आत्महत्या करताना लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाची हकीकत अशी की, कुरखेडा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या आंजनटोला या गावातील एका तरुणीने गेल्यावर्षी पोलीस भरतीचे स्वप्न रंगवत गडचिरोलीत सराव सुरू केला होता. लांझेडा भागात ती रूम करून राहात होती. अशातच इन्स्टाग्रामवर तिची ओळख शिवकुमार छोटेलाल करसायल (28 वर्ष) रा.टेमली, ता.कोरची या तरुणाशी झाली. शिवकुमारसुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असल्याने मैदानावर दोघांची जवळीकता वाढली. त्यातून दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले. दरम्यान पोलीस भरतीत शिवकुमारची निवड झाली, पण त्याच्या प्रेयसीची निवड होऊ शकली नाही. शिवकुमारची किटाळीच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये ड्युटी लागली. पोलीस भरतीत निवड झाली नसल्याचे दु:ख पचवत तरुणीने आपले गाव गाठले, पण शिवकुमारशी असलेले प्रेमसंबंध कायम होते. भविष्यात आपलीही पोलीस भरतीत निवड होईल, शिवकुमारशी लग्नही होईल या आशेवर ती होती.
पण इकडे शिवकुमारची ओळख गडचिरोली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत (26 वर्ष), रा.बोडधा, ता.देसाईगंज हिच्याशी झाली. यादरम्यान शिवकुमार आपल्या प्रेयसीपासून दुरावल्या गेला. तो लग्नासाठीही तयार नसल्याने प्रेयसी तरुणी नैराश्यात गेली. त्यातच महिला शिपाई अश्विनीने तिला फोन करून अपमानास्पद भाषेत तिची खरडपट्टी काढली. यामुळे ती तरुणी पूर्णपणे खचली. ज्याच्यावर प्रेम केले त्याने धोका दिला, सर्व स्वप्न भंग झाले, या नैराश्याने तिला ग्रासले आणि यातून तिने गेल्या 7 सप्टेंबर रोजी आपल्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. पण आत्महत्येपूर्वी तिने आपली आपबिती चिठ्ठीत लिहून ठेवली होती.
तरुणीच्या आईला तिची ही मनस्थिती माहित होती. पोलीस तक्रारीत आईने आत्महत्येमागील कारणांचा उल्लेख करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. अखेर कुरखेडा पोलिसांनी सर्व घटनाक्रमाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर 52 दिवसांनी पोलीस शिपाई शिवकुमार करसायल आणि महिला पोलीस शिपाई अश्विनी राऊत यांना त्या तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून अटक केली. कायम सर्वांसाठी सारखा असतो हे या कारवाईतून पोलिसांनी दाखवून दिले.
या प्रकरणाचा अधिक तपास कुरखेडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करीत आहे.
































