गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा राबविला जाणार आहे. या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी दिली.
यासोबत रविवारी सकाळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होणार आहे. 12 बलुतेदार व 18 अलुतेदार जातीतील शेवटच्या समाज घटकापर्यंतच्या लोकांचा विकास व्हावा या उद्देशाने या योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे. खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खा.नेते यांनी केले आहे.
सेवा पंधरवड्यात भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रमही होणार आहेत.
आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्डचे वाटप, तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. या पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहेत.
रविवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत ‘धन्यवाद मोदीजी’ लाभार्थी संमेलने मंडळस्थळी घेतली जाणार आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी गरीब कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाईल.