एटापल्ली : आदिवासीबहुल एटापल्ली तालुका हा अहेरी विधानसभेचा अविभाज्य घटक असून एटापल्ली तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली.
धर्मरावबाबा यांनी नुकतीच एटापल्ली तालुक्यातील शेवारी, ताटीगुंडम, गेदा, डुम्मे आदी गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्ष प्रसाद, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे एटापल्ली तालुका उपाध्यक्ष पवन निलिवार, विजय अतकमवार, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, गेदाचे उपसरपंच दुसरी मट्टामी, ग्रा.पं.सदस्य मिरवा पदा, अजय पदा, मेसो पदा, संदीप वैरागडे, अरविंद वेलांटी, अरुणा तलांडी, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील खेड्यापाड्यांचा विकास करायचा असेल तर मुख्य रस्ते, नदी-नाल्यांवर पुलाचे बांधकाम करून त्या गावांना तालुका मुख्यालयाशी जोडल्याशिवाय पर्याय नाही. आजही अनेक गावे विकासापासून वंचित आहेत. त्या गावांत मूलभूत सुविधा देण्यासोबत विकासकामांना गती कशी मिळेल यासाठी वरिष्ठ पातळीवर आपले प्रयत्न सुरू आहेत. माझ्या मतदार संघातील विविध समस्या शासन दरबारी मांडून हळूहळू त्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहे. एवढेच नव्हेतर आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर दिला जात असल्याचे आ.धर्मराव बाबा यावेळी म्हणाले.
‘या’ कामांचे केले लोकार्पण व भूमिपूजन
येमली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या ताटीगुंडम येथे पांडू डोलू दुर्वा ते जनार्दन तुलसीराम मांडवगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली बांधकाम, मंगी माधव आलम ते बुद्धा लालू वेलादी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाली बांधकाम करण्यात आले. मौजा घोटसूर येथे गणेश शेंडे ते बालाजी मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड बांधकाम करण्यात आले. या कामांचे लोकार्पण आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय शेवारी गावात जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे आणि गोटूल बांधकामाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.