देसाईगंज : पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर ओबीसी, विशेष मागास प्रवर्गातील गरीब व गरजु नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता महायुती शासनाने महत्वाकांक्षी मोदी आवास घरकुल योजना आणली. पण अनुदान अर्धवट मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांची कोंडी झाली होती. आमदार कृष्णा गजबे यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करत 40 कोटींचा निधी खेचून आणला. त्याबाबतचा आदेश दि.28 ला काढण्यात आल्याने घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सदर योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले. मंजुरीअंती या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले. अनेक लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर काहींचे बांधकाम अर्धवट आहे. यालाभार्थ्यांपैकी अनेकांना पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मिळालेले आहे. परंतु पुरेसे अनुदान प्राप्त न झाल्याने अनेकांची आर्थिक कोंडी होऊन त्यांना बांधकाम साहित्य, मजुरांची मजुरी देताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब आ.कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घरकूल लाभार्थ्यांची व्यथा मांडली.
सदर मागणीच्या अनुषंगाने दि.28 ऑगस्ट रोजी 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे लवकरच मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना उर्वरित टप्प्यातील अनुदान मिळण्यास मदत होईल. या सहकार्याबद्दल आमदार गजबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तथा ना.अतुल सावे यांचे आभार व्यक्त करून आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.