बातमीनंतर रेती तस्करांसह महसूल विभाग झाला सतर्क, गाडीवाल्यांना तंबी

पथक पोहोचण्याआधीच गाड्या रिकाम्या

गडचिरोली : शहरालगतच्या कठाणी नदीघाटावरून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या रेती तस्करीची बातमी ‘कटाक्ष’ने सविस्तरपणे झळकवताच सोमवारी महसूल विभागाचे पथक आणि रेती तस्करही सतर्क झाले. गडचिरोलीच्या मंडळ अधिकाऱ्यांसह महसूलच्या पथकाने सकाळी कठाणी नदीघाट गाठला. पण हे पथक येणार असल्याची चाहुल आधीच लागल्याने गाडीत भरलेली रेती नदीपात्रात ओतून गाडीवाल्यांचा शहराच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न सुरू होता. महसूलच्या पथकाने त्यांना गाठून नदीघाटाकडे पुन्हा गाड्या दिसल्यास कायदेशिर कारवाई करणार, अशी तंबी दिली.

महसूल विभागाचे पथक नदीघाटाकडे येणार असल्याची खबर रेती तस्करांपर्यंत कशी पोहोचली? याचे आश्चर्य पथकातील सदस्यांना वाटले. वास्तविक नदीघाटाकडे जाण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्याशिवाय कोणालाही याबाबतची माहिती दिली नव्हती. असे असताना तस्करांपर्यंत माहिती पोहोचविणारे ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पथक पोहोचण्याआधीच रेतीच्या गाड्या रिकाम्या केल्याने कोणावरही प्रत्यक्ष कारवाई न करता केवळ तंबी देऊन महसूलच्या पथकाला परतावे लागले. पण दररोज शेकडो बैलगाड्या आणि इतर वाहनांनी रेती लंपास करणारे हे गब्बर केवळ तंबी देऊन ऐकतील का, आणि त्यांना रोखण्यात महसूल विभाग यशस्वी होईल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दोन दिवस शांत बसून पुन्हा तस्करांचा तोच उपक्रम सुरू होणार का, याकडे आता सर्वांना लक्ष ठेवावे लागणार आहे.

नाका एकीकडे, तस्करी दुसरीकडे

कठाणी नदीघाटावरून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती तस्करीबद्दल सोमवारी (दि.24) तहसीलदार संतोष आष्टीकर म्हणाले, रेतीची तस्करी पहिल्यांदा होत आहे असे मुळीच नाही. यापूर्वीही ती होत होती. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहराच्या चारही दिशेने नाके लावले असल्याचे ते म्हणाले. यात आरमोरी मार्गावरील नाका गोगाव येथे, म्हणजे नदीच्या पलिकडील बाजुने लावला आहे. वास्तविक कठीण नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजुने तस्करांकडून मोठ्या प्रमाणात काढली जाणारी रेती ही नदीच्या अलीकडील बाजूनेच बाहेर काढून शहराच्या दिशेने त्या रेतीची वाहतूक केली जाते, हे सर्वश्रुत आहे. असे असताना गोगावमध्ये नाका लावण्याला काहीच अर्थ नाही. त्याबद्दल विचारले असता एसडीओंच्या निर्देशानुसार गोगावमध्ये नाका लावला, असे स्पष्टीकरण तहसीलदार आष्टीकर यांनी दिले.

वास्तविक रेती तस्करीचे छुपे मार्ग कोणत्या बाजुने आहेत याची महसूलच्या पथकाला चांगली माहिती आहे. असे असताना चुकीच्या ठिकाणी नाका लावत असल्याची बाब तहसीलदारांनी एसडीओंच्या निदर्शनास का आणून दिली नाही? यावरून रेती तस्करांना कोणाचे छुपे पाठबळ मिळत आहे, हे स्पष्ट होते.