अल्पवयीन नोकरानेच दुकान फोडून चोरले मालकाचे तीन लाख रुपये

तीन सहकाऱ्यांनाही पोलिसांकडून अटक

कुरखेडा : येथील एका जनरल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन नोकराने आपल्या मित्रांच्या मदतीने रात्री सराईत चोरट्यांप्रमाणे दुकानाचे कुलूप तोडून तीन लाख रुपये रोख लंपास केले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तो नोकर गायब असल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर त्याने या चोरीची कबुली दिली.

प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा शहराच्या मुख्य मार्गावर साहील हिरालाल वरलानी यांचे जनरल स्टोअर आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी व्यावसायिक कामानिमित्त 3 लाखांची रोकड दुकानात ठेवली होती. दुकानातील अल्पवयीन नोकराला त्याबद्दल माहिती होती. त्यामुळे त्याने त्याच रात्री मित्रांच्या मदतीने दुकानाचे कुलूप फोडून ती रक्कम पळविण्याची योजना आखली आणि त्यात ते यशस्वीही झाले. या कामात दोन अल्पवयीन मित्रांसह इब्राहिम इस्राइल कुरेशी (20 वर्ष) यांनीही मदत केली. त्यामुळे पोलिसांनी 48 तासात चारही आरोपींना ताब्यात घेतले. याशिवाय त्यांच्याकडील चोरलेली रक्कमही हस्तगत केली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, उपनिरीक्षक वर्षा बोरसे, हवालदार शेखलाल मडावी, संदेश भैसारे आदींनी केली.