गडचिरोली : श्री सत्यसाई विद्यापीठ संस्थान कर्नाटक यांच्यावतीने सत्यसाई ग्राम, मुदेनहुली, कर्नाटक येथे डॉ.अभय व डॉ.राणी बंग या जोडप्याला ‘द लिजेंड्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील मानवी उत्कृष्टतेसाठी सत्यसाईबाबांच्या 99 व्या जयंतीनिमित्त 23 नोव्हेंबरला मुधुसुदन साई आणि डॉ.सी.श्रीनिवासन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बंग दांपत्याने गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या 38 वर्षात लाखो रुग्णांना वैद्यकीय सेवा, जागतिक मान्यता मिळालेले आरोग्य संशोधन, दारू व तंबाखू कमी करण्यासाठी मुक्तिपथ हा जिल्हाव्यापी कार्यक्रम, युवांसाठी निर्माण व तारुण्यभान हे उपक्रम राबविले आहेत. बालमृत्यू कमी करण्याची त्यांनी सांगितलेली पद्धत भारत सरकारद्वारे ‘आशा’ योजनेद्वारे पूर्ण भारतात अंमलबजावणी केली जाते.
डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांना यापूर्वी महाराष्ट्र भूषण व पद्मश्री सन्मान प्राप्त असून जवळपास 70 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘टाइम’ मॅगझिनने (अमेरिका) त्यांना ‘ग्लोबल हेल्थ हिरो’ म्हणून 2005 मध्ये सन्मानित केले. तर द लॅन्सेट ने त्यांना ‘द पायोनिअर्स इन रूरल हेल्थ केअर’ म्हणून गौरविले आहे.