गडचिरोली : सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे हाती बिअरच्या टिन, दारूचे ग्लास घेऊन मद्यप्राशनाचा शौक पूर्ण करणाऱ्या 5 शिक्षकांची शिक्षण विभागाकडून चौकशी केली जात आहे. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गटशिक्षणाधिकारी ही चौकशी करत आहेत. त्यांच्या अहवालानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील कारवाई करतील, असे शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी सांगितले.
एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवादरम्यान काही शिक्षक दिवसाढवळ्या एटापल्लीच्या गट्टा मार्गावरील एका दारूच्या ठिय्यावर जाऊन मद्यपान करत असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.