Home दैनंदिन बातम्या जिल्ह्यात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन

जिल्ह्यात 84 हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन

येत्या 3 मार्च रोजी लसीकरण मोहीम

गडचिरोली : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील 84 हजार 181 बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक लाख पोलिओ डोस उपलब्ध करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांनी दिली.

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी 3 मार्च रोजी निश्चित केली आहे. या दिवशी 5 वर्ष वयापर्यंतच्या सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. यात 100 टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात 2145, तर शहरी भागात 49 अशी एकूण 2194 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, यात्रा स्थळे या ठिकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होणाऱ्या बालकांकरिता ग्रामीण भागात 111 आणि शहरी भागात 20 अशा एकूण 131 ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी 184 मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिल्या आहेत. योग्य समन्वयातून लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले आहे.