विविध उपक्रमांतून होणार आज शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

सहपालकमंत्री उपस्थित राहणार

गडचिरोली : यावर्षीच्या शैक्षणिक सत्राचा शुभारंभ आज, सोमवार दि.23 जूनपासून होत आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. सर्व नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासह विविध उपक्रम ठेवण्यात आले असून या कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्यासह खासदार, आमदार आणि सनदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये स्वागतोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. शिक्षण विभागातर्फे 21 व 22 जून रोजी शाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रवेशोत्सवासाठी फुगे व फुलांनी शाळेची आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, पालक शिक्षक संवाद आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट व मोजे शाळेच्या पहिल्याच दिवशी वितरीत करण्याचे निर्देश सीईओ गाडे यांनी दिले आहेत. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण करणे, शिक्षणाविषयी सकारात्मकता वाढवणे आणि शाळेची ओळख करून देणे, हे या प्रवेशोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थी उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठीही विशेष नियोजन करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी कळविले आहे.

सहपालकमंत्री जयस्वाल यांचा दौरा

राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल 23 जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 8.15 वाजता गडचिरोली विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी 8.45 वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती. 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता विश्रामगृहात त्यांचा वेळ राखीव राहणार असून दु.2.35 वाजता जिल्हा परिषद येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता विश्रामगृहातून सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करतील.