गडचिरोली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (दि.31), अर्थात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पोलिसांच्या पुढाकाराने गडचिरोलीत काढण्यात आलेल्या एकता दौडमध्ये हजारावर विद्यार्थी, नागरिक आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, तसेच प्रथमच आत्मसमर्पित माओवाद्यांनीही सहभाग घेतला. गडचिरोलीसोबत जिल्हाभरातील पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने ठिकठिकाणी ही एकता दौड लक्षवेधी ठरली.
जिल्ह्रातील नागरिकांमध्ये एकता, अखंडता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी, तसेच संविधानात्मक मुल्यांचे जतन करण्यासाठी एकता दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्रांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी डिजिटल एकता मॅरेथानचेही आयोजन करण्यात आले.
गडचिरोलीत सकाळी 7 वाजता पोलीस मुख्यालय ते हॉटेल लँडमार्क आणि पुन्हा पोलीस मुख्यालय अशा 5 कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी, अंमलदार, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावर्षी पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी एकता मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदविला. सहभागी धावपटूंनी एकात्मतेचा संदेश देणारे फलक हातात घेऊन उत्साहाने धाव घेतली. यावेळी पोलीस बँड पथकाच्या वतीने राष्ट्रभक्तीपर धून वाजवून स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यात आले.
यासोबतच शहिद पांडू आलाम सभागृहात आयोजीत कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन सहभागी स्पर्धकांपैकी प्रथक, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या युवक-युवतींना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी आत्मसमर्पित सदस्य आणि जेष्ठ नागरिकांना देखिल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नागरिकांनी देशाची एकता व अखंडता जोडण्यासोबतच सायबर गुन्ह्रांपासून सावध राहावे, ऑनलाईन फसवणूक व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, तसेच सायबर गुन्ह्रांपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत आपला ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती शेअर करु नये, याबाबतचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., प्रभारी सहा.पोलीस अधीक्षक (गडचिरोली) सुयश सिंग तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































