गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात अवघ्या दोन दिवसांत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली. यात एक फार्मसी, एक बेकरी आणि एका रेस्टॅारंटचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गालगतच्या ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी महामार्गावरील डॉ.कुंभारे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या स्मार्ट केअर फार्मसी या मेडिकल दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी या औषधालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ड्रॅावरमधील रोख रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना पहाटे 3 वाजताच्या दरम्यान घडली. (अधिक बातमी खाली वाचा)

याचदरम्यान धानोरा मार्गावरील साई वृंदावन रेस्टॅारंटमध्येही चोरट्यांनी कुलून तोडून प्रवेश केला. येथेही काऊंटरमधील रक्कम घेऊन ते पसार झाले. विशेष म्हणजे आधल्या दिवशीच मध्यरात्री चामोर्शी मार्गावरील वडेट्टीवार कॉम्प्लेक्समधील कृष्णा बेकरी येथेही पहाटेच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती. लागोपाठ झालेल्या या तीन चोऱ्यांमुळे गडचिरोली पोलिसांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद, प्रत्यक्षात मोकळे
चोरी करणाऱ्यांच्या टोळीत दोन तरुण मुले आणि दोन मुलींचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चेहरा स्कार्फने पूर्ण झाकला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. 10 दिवसांपूर्वी गोकुलनगर येथील गणेश कॉलनीमध्येसुद्धा दोन घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती. त्यामुळे चोरट्यांची टोळीच सक्रीय असून या चोरीच्या घटनांमुळे शहरवासींमध्ये असुरक्षिततेची भावना बळावत आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा लवकर बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा केली जात आहे.