गडचिरोली : शहरातील वाढत्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे शहरात अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवित असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अल्पवयीन दुचाकीचालकांना रोखण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत दोन दिवसात 24 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनूसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास (म्हणजे पालकास) 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे.
दि.29 जून रोजी अल्पवयीन मुलांना दूचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या 14 पालकांवर, तसेच दिनांक 3 जुलै रोजी 10 पालकांवर अशा एकूण 24 पालकांवर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गडचिरोली पोलिसांमार्फत शहरातील पाच विविध ठिकाणी नाकाबंदी मोहिम राबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान काही अल्पवयीन मुले वाहन चालविताना मिळून आले. या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी या मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये सदर 24 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते. सदर कलमानुसार अल्पवयीन मुलाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनूसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकास 3 वर्षापर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच अशा अल्पवयीन बालकावर बाल न्याय अधिनियम 2015 नुसार बाल न्याय मंडळासमोर खटला सुद्धा चालविला जाऊ शकतो.
शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करुन द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले असून यापुढे ही मोहिम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
ही मोहिम अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, वाहतूक शाखेचे सपोनि. शरद मेश्राम व इतर अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.