गडचिरोली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. पण 22 जानेवारी रोजी केंद्र शासनाने जारी केलेल्या राजपत्रात जनगणनेसंबंधी असलेल्या 33 सूचीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा उल्लेख आहे, मात्र ओबीसीचा उल्लेखच नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना होईल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असून ओबीसी समाजात या मुद्द्यावरून संतापाची लाट उसळत आहे.
देशभरात जातीय जनगणना केली जावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या, तसेच इतर समविचारी ओबीसी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 30 मे 2025 रोजी झालेल्या बैठकीत देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय रेल्वे तथा माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती देशाला दिली होती.
जनगणनेच्या सूचीतून ओबीसींना डच्चू?
अॅाक्टोबर 2026 पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये, तर उर्वरित भागात मार्च 2027 पासून जनगणना सुरू करण्यात येणार असल्याचे 16 जून 2025 रोजी स्पष्ट करण्यात आले होते. 7 जानेवारी 2026 रोजी जनगणनेसंदर्भात राजपत्र जारी केले गेले. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी जनगणना करण्यासाठी 33 सूची तयार करून राजपत्रात समाविष्ट करण्यात आल्या. या सूचीमध्ये घर क्रमांक, सामग्री, घराची स्थिती, कुटुंब क्रमांक, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग, विवाहित दांपत्यांची संख्या, घरातील खोल्यांची संख्या, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत, पेयजलाची उपलब्धता, वीज, शौचालय, रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप किंवा कॅाम्प्युटर, मोबाईल, कार, मुख्य धान्य अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच 12 व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि जमातीचा उल्लेख करण्यात आला, इतरांसाठी अन्य शब्दांचा प्रयोग करताना ओबीसींचा स्पष्ट उल्लेख मात्र टाळण्यात आला आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना होईल की नाही, असा संभ्रम ओबीसी समाजात निर्माण झाला आहे.
यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा यासंदर्भात देशभर आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शेषराव येलेकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष रामकृष्ण ताजने, उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, प्रा.देवानंद कामडी, सचिव सुरेश भांडेकर, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, संघटक चंद्रकांत शिवणकर, युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला अध्यक्ष मंगला कारेकर आदींनी दिला आहे.
































