गडचिरोली : राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लॅायड्स मेटल्सकडून विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यासाठी 34.53 लाखांची आर्थिक मदत सिरोंचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. याशिवाय कॅम्पमधील पायाभूत सुविधां व इतर कामांसाठी 40 लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे.
विशेष म्हणजे कित्येक वर्षांपासून कमलापूर हत्ती कॅम्पमधील माहुतांना हत्तींना हाताळण्याचे शास्रशुद्ध प्रशिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी यांच्या कॉर्पोरेट एन्व्हायर्नमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी (CER) उपक्रमांतर्गत आठवडाभर माहुत आणि हत्तींची देखभाल करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांसाठी हत्ती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश हत्ती आणि माहुतांच्या कौशल्यवृद्धीसोबत त्यांच्यातील समन्वय, सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढविणे हा होता.
प्रशिक्षण तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.राजेश यांनी हे प्रशिक्षण दिले. डॅा.राजेश हे मुदूमलाई व्याघ्र प्रकल्प (तामिळनाडू) येथील टेप्पकडू हत्ती कॅम्प येथून आले होते. या प्रशिक्षणामध्ये हत्तींना आदेश देण्याची पद्धत, हत्तींची वर्तणूक प्रतिसाद, कंडीशनिंग तंत्र, मानवी पद्धतीने हाताळणी, शिस्त, वर्तणूक व्यवस्थापन तसेच आरोग्य तपासणी आणि निरीक्षण यांवर विशेष भर देण्यात आला.
हा कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वन्यजीव संरक्षक एम.एस.रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महाराष्ट्राचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आणि लॅायड्स मेटल्सचे सल्लागार महिप गुप्ता यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. यामध्ये सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, लॅायड्सचे महाव्यवस्थापक अमिताव मलिक आणि उपव्यवस्थापक (वन्यजीव) कुम्मारी स्वामी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन कमलापूरचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौरेश गौतम गडमाडे, प्रोबेशनरी रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने आणि डॉ.नागेश्वर रामलाल चौहान यांच्या हस्ते, वन विभागातील अधिकारी तसेच लॅायड्सचे प्रतिनिधी निक्षेपन गौड यांच्या समन्वयाने करण्यात आले.
कंपनीच्या या पुढाकाराने कमलापूरमधील इको-टुरिझमला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप कमलापूर रेंज कार्यालयात घेण्यात आला. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (ACF) विष्णुवर्धन रेड्डी (IFS), रेंज फॉरेस्ट ऑफिसर गौतम गडमाडे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर अनिरुद्ध माने तसेच वन विभागाचे कर्मचारी आणि कॅम्पमधील कर्मचारी उपस्थित होते.
































