अहेरी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त बटालियन 9 आणि 37 कडून संयुक्तपणे प्राणहिता पोलीस कॅम्प येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्राणहिता पोलीस कॅम्प, उपजिल्हा रुग्णालय आणि अहेरीच्या नागरिकांसह सीआरपीएफचे अधिकारी, जवान यांनी यात सक्रिय योगदान दिले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन 37 बटालियनचे कमांडंट डव इंजिरकन किंडो यांनी केले. यावेळी बटालियन 9 चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस. मोहन, द्वितीय कमांड अधिकारी सत्य नारायण मीना, द्वितीय कमांड अधिकारी बी.व्यंकट रेड्डी, 37 बटालियनचे उपकमांडंट चंद्रमोर अनिल, 9 आणि 37 बटालियनचे जवान, जिल्हा रुग्णालयाची चमू आदींनी रक्तदान यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. यावेळी सीआरपीएफच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जवळच्या गावातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना औषधोपचार दिले.
दि.6 मार्चला कोठी आणि आसपासच्या गावातील लोकांसाठी सुविधा म्हणून सीआरपीएफच्या G/37 बटालियनच्या वतीने वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोफत वैद्यकीय तपासणी करून नागरिकांना मोफत औषधे वाटण्यात आली. या दोन्ही ठिकाणी नागरिक आणि जवानांनी उत्साहाने सहभाग घेतला.
































