Home दैनंदिन बातम्या छत्तीसगड सीमेवरच्या जंगलात 11 वे पोलीस मदत केंद्र सुरू

छत्तीसगड सीमेवरच्या जंगलात 11 वे पोलीस मदत केंद्र सुरू

घनदाट जंगलात 24 तासात उभारणी

गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील जंगलातील सुरक्षेची पोकळी भरून काढण्यासह माओवाद्यांचे त्या भागातील सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करून विकासाला गती देण्यासाठी आणखी एका पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. बंगाडी येथे अवघ्या 24 तासात हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. गेल्या तीन वर्षात अशा पद्धतीने उभारलेले हे 11 वे पोलीस मदत केंद्र आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

तब्बल 1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी आणि खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने घनदाट जंगलात अवघ्या 24 तासात या पोलीस मदत केंद्राची उभारणी करून गावकऱ्यांच्या साक्षीने गुरूवारी ते सुरू करण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 192 बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग, इतर वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे नागरिकांपर्यंत सुरक्षा आणि विकास पोहोचवणे शक्य होणार असून येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. (अधिक बातमी खाली वाचा)

लाहेरीपासून 8 किमी व छत्तीसगड सिमेपासून फक्त 2 किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता बंगाडी पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

अशी केली 24 तासात उभारणी
सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकूण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 8 ट्रेलर, 2 पोकलेन, 20 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. त्या ठिकाणी पोलीस दलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 15 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, केंद्राच्या सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी. मोर्चा, 8 सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत आहे. यासोबतच पोलीस दलाचे 3 अधिकारी व 55 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 3, जालना सी कंपनीचे 2 प्लाटुन, तसेच सीआरपीएफ 192 बटा.सी कंपनीचे 1 असिस्टंट कमांडंट व 52 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 8 पथक (200 कमांडो) तैनात करण्यात आले आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

विकासाला मिळणार गती
पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जनजागरण मेळावा आयोजित करुन महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, ब्लँकेट, मच्छरदाण्या, युवकांना टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्ग, पूल, मोबाईल टॉवर तसेच गुंडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार आहे. याभागातील विकास कामांना गती मिळणार आहे. तसेच येथील दुर्गम भागात भविष्यात एस.टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार आहे.