गडचिरोली : राज्याच्या अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या आस्थापनेवर असलेली महामार्ग पोलिसांची गडचिरोली विभागाकरिता मंजूर असलेली पदे आता पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक नियंत्रक पथकाची सुत्रं आता पोलीस अधीक्षकांच्या हाती आली आहेत.
गडचिरोली विभागाकरिता महामार्ग पोलिसांची 35 पदे निर्माण करण्यात आली आहेत. त्यात सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या प्रत्येकी एका पदासह पोलीस हवालदार 8, पोलीस शिपाई 21, आणि चालक पोलीस शिपाई 3 अशा एकूण 35 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे आतापर्यंत पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या आस्थापनेवर होती. मात्र ती पदे पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्याची विनंती पोलीस महासंचालकांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार गृहविभागाने तसा निर्णय घेतला आहे.
या निर्णयात गडचिरोली जिल्ह्यासाठी असलेला महामार्ग पोलीस विभाग बंद करून त्यांचे संपूर्ण संचालन पोलीस अधीक्षकांकडे वर्ग करण्यात येत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे आता जिल्हाभरातील वाहतूक नियंत्रणाची सुत्रं पोलीस अधीक्षकांकडे आली आहेत.
































